Saturday, July 27, 2019

माझी पहिली कविता आणि मी..!! (भाग २)




                   कालच्या त्या कवितेनंतर मी तर खूप खुश होतो
कारण माझं पाहिलेलं स्वप्न आज माझ्या हातात होतं.त्याच आनंदात मी आज शाळेत जरा लवकरच पोहोचलो. कधी सर वर्गात येतील आणि कधी मी माझी कविता त्यांना दाखवतोय असं झालं होतं.
                   आता मला मात्र राहवत नव्हतं , रोज शाळेत गेल्यानंतर शाळा भरे पर्यंत खेळणारा मी माहित नाही आज मात्र शाळा भरण्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो..!
शेवटी शाळेची बेल वाजली आणि माझं वाट पाहून संपलं. नेहमीप्रमाणे परिपाठ झाला , गाणी झाली अन मी म्हणजे मागे.. सर कविता दाखवल्यावर काय म्हणतील ? त्यांना आवडेल का? अशा विचारात मग्न.

                   रोजच पहिला तास मराठीचा असायचा त्यामुळे आता जास्त वाट पाहावी लागणार नाही यामुळे खूप बरं वाटत होतं. सर वर्गात आले आणि त्यांनी विचारलं " तर मग , कोणी कोणी लिहिलंय कविता ? चला हात वर करा " सरांच हे वाक्य संपताच रोज शांत असणारा मी आज अचानक मोठ्याने ओरडलो.."सर मी...!!"

                रोज सरांनी काही विचारल्यावर मुलांचा जो   'सर मी' , 'सर मी' असा गोंधळ असतो तो आज जाणवला नाही. मी एकटाच मुलं ओरडतील तेंव्हा आपला आवाज मोठा यावा म्हणून जोरात म्हणालो होतो...असा एकटाच मोठ्याने ओरडल्याने मी क्षणभर जरा शांतच झालो.

                मग सरांनीच जवळ येऊन पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि कवितेची वही हातात घेतली. सर शांतपणे कविता वाचत होते आणि माझे डोळे त्यांचे हावभाव पाहत होते. मला याचीच उत्सुकता जास्त होती की सर कविता वाचून काय म्हणतील..

                       सरांनी कविता वाचली आणि एक गोड असं स्मितहास्य केलं. त्यांच्या त्या नजरेत असं दिसत होतं की त्यांना ही कविता खूप आवडलीय.
         मग सरांनी मला जवळ बोलावलं आणि परत एकदा पाठीवर हात ठेवला आणि कविता वाचायला सांगितली. मग मी पहिल्यांदा आज स्वतः लिहिलेली कविता माझ्या वर्गासमोर वाचत होतो.....मी कवितेला सुरुवात केली...

एक दिवस काय झालं
चमत्कारच घडला 
एक झाड मला 
चक्क बोलूच लागला...।।१।।



जेंव्हा मी भिऊन 
पळू लागलो लांब
तेंव्हा झाड म्हणाले मला
थांब जरा थांब...।।२।।



झाड म्हणाले मला 
मी उदास असतो खूप
आता माझ्याभोवती माकडे 
करत नाहीत हुपहूप...।।३।।



या वृक्ष तोडीमुळे 
आमची होत आहे हानी
मग पाखरांना कोठून मिळणार 
खायला दाना पाणी...।।४।।



म्हणून मी विनंती करतो 
आतातरी जागे व्हा
प्रेत्येकान एक तरी 
झाड लावून जगवा...।।५।।



झाडे लावा झाडे जगवा 
हा संदेश भला
हा संदेश पाळून 
वाचवा या सुंदर पृथ्वीला...।।६।।



हा संदेश पाळून 
वाचवा या सुंदर पृथ्वीला...!! "


               माझी कविता  संपल्या बरोबर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला ती त्यादिवशी मला मिळालेली सर्वांत
अनमोल अशी भेट होती..!! आणि त्याच दिवसापासून सुरु झाला माझ्या कवि जीवणाचा प्रवास ; ज्यामध्ये अर्जुनाला जसा मार्गदर्शन करणारा सारथी कृष्ण होता अगदी त्याचप्रमाणे माझ्या या प्रवासातील सारथी माझे आवडते 'स्वामी सर' होते.
         अजूनही त्यांची पाठीवरची थाप कायम आहे ज्यामुळे मी लिहू शकतो हे मला कळलं आणि त्यांच्याच मुळे हे मी मांडू शकलो..🙏🙏🙏

*(पुन्हा भेटू अशाच माझ्या नवीन कवितासोबत आणि काही जीवनातील खास प्रसंगासोबत)😊🙏🙏🙏
 
                                                       - वेदपाठक शुुभम

माझी पहिली कविता आणि मी..!! (भाग १)




      जेंव्हा मी माझ्या पहिल्या लिहिलेल्या कवितेचा विचार करतो,  मन आपसूकच मला त्या क्षणावर घेऊन जातं जेंव्हा कविता लिहिणे म्हणजे माझं फक्त मी पाहत असलेलं स्वप्नच होतं.
        तो दिवसही तसा साधाच होता, रोजच्यासारखाच.
मि आपला शाळेकडे निघालो पण मला माहित नव्हतं कि शाळा सुटली कि घराकड एकटाच जात असताना जे कविता लिहिण्याचे विचार माझ्या मनात घोळत असत ती कविता आज मी लिहिणार आहे!
      मी शाळेत पोहोचलो आणि पहिला तास मराठीचाच होता तोही माझा एकदम आवडता. मग बाकावर बसून मी आपला मला कविता कधी लिहिता येईल का याच विचारात हरवलेला होतो. एव्हाना तर माझं स्वप्नच हे होत की कधी का होईना पण एखादी कविता लिहायचीच.

               मी माझ्या विचारात हरवलो होतो तितक्यात माझे सर वर्गात आले त्यांचं नाव  " स्वामी सर" हो तेच सर ज्यांच्यामुळे मी आज एवढ्या कविता लिहू शकलो.
            आज वर्गात पण सर कविताच शिकवणार होते , ते इतके तल्लीन होऊन शिकवत कि तास कधी संपला कळतंच नाही. असाच तोही तास संपला आणि सरांनी जाताना आम्हाला गृहपाठ दिला. हा आता गृहपाठ म्हणलं कि सगळ्यांनाच नकोस होतं पण मी विषय ऐकला अन एकदम आनंदूनच गेलो सरांनी सर्वाना सांगितलं होतं की उद्या येताना सर्वांनी 'झाड'
या विषयावर कविता लिहून आणायची.

         मग काय...? तो योग आलाच जेंव्हा माझी पहिली कविता लिहिण्याची वेळ होती. खूप मस्त वाटत होत. मी पूर्ण दिवस कवितेचाच विचार करत होतो,  काय लिहावं..? कसं लिहावं..? कळत मात्र काहीच नव्हतं.
        तरीही सरांचा आवडता विद्यार्थी असल्याने गृहपाठ पूर्ण करायचाच होता. मग कसाबसा लिहायला लागलो. कवितेचे थोडेफार नियम माहित होते सरांनी शिकवल्याप्रमाणे, मग कसाबसा यमक जुळवत करत होतो कविता.
शेवटी विषय सुचलाच.! मी असं लिहायच ठरवलं की एक झाड मला बोलत आहे आणि तो त्याचं दुःख मला सांगतोय, आणि मला झाडे वाचवली पाहिजेत असा संदेश सुद्धा माझ्या कवितेतून द्यायचा होता.

        मी माझं पहिलं कडवं लिहिलं..

"एकदिवस काय झालं
चमत्कारच घडला
एक झाड मला
चक्क बोलूच लागला..."

       चला हे तर झालं पण पुढे काय..? अजून विचारांचं मंथन सुरु झालं आणि मी विचार केला की झाड बोललं म्हणजे हे तर अनपेक्षितच होतं.. मग कोनाचीही जी प्रतिक्रिया असेल तीच माझीही झाली आणि मग मी पुढे लिहिलं..

"जेंव्हा मी भिऊन
 पळू लागलो लांब
तेंव्हा झाड म्हणाले मला
थांब जरा थांब..."

        अरे जमलं कि लिहायला. मला खूपच आनंद झाला होता मग झाड मला काय म्हणेल त्याच दुःख त्यानं  मला सांगितलं आणि यातून हेच मलाही कळलं होतं की झाडे तर वाचवायला हवीत आणि पुढे हाच संदेश लिहायचा विचार करून मी माझी पहिली कविता पूर्ण केली.
जवळ जवळ पन्नास वेळेस तरी ती मी ती कविता वाचली असेन आणि वाचून दाखवली असेल.माझं एक कविता लिहिण्याचं स्वप्न आज पूर्ण झालं होतं.

    (तर मित्रांनो वाचायचीय ना तुम्हाला पण ती कविता...? अरे हो पण अजून मी शाळेत जाऊन कविता सरांना दाखवली नाही ना..!! याच्या पुढच्या भागाची नक्की वाट पहा त्यात ती कविता मी शाळेत म्हणून दाखवणार आहे मग तुम्हीही ऐका...!!😊)

                                       To be continued....




Friday, July 26, 2019

Post 1





नमस्कार, 
मी वेदपाठक शुभम मी आज तुमच्या समोर आलोय ते म्हणजे 'शब्द श्वासात गुंफलेले' हा नवीन ब्लॉग काढल्यामुळे..

मित्रांनो हे  'शब्द श्वासात गुंफलेले' म्हणजेच मी लिहिलेल्या कवितांचा प्रवास आहे. मी सध्या माझा डिप्लोमा पूर्ण केलाय आणि या 19 वर्षाच्या आत्तापर्यंतच्या माझ्या जीवनात कवितांना सुरुवात झाली ती म्हणजे मी 8 वी ला असताना. आत्तापर्यंत माझ्या शंभर एक कविता लिहून झाल्या आहेत आणि त्याच कविता आणि त्या कविता मी कशा लिहिल्या व  त्यामागचे काही प्रसंग मी 'शब्द श्वासात गुंफलेले' यामध्ये तुमच्या समोर मांडणार आहे.

   मला खात्री आहे की माझ्या या लिखाणाला तुमचा उत्तमच प्रतिसाद मिळेल.आज मी आपल्यासमोर माझी एक कविता देत आहे..त्यामुळे ती कशी वाटली हे नक्की कळवा..🙏🙏


                            शब्द श्वासात गुंफलेले...!!

भावनांचे नभ जे मनात दाटलेले
          कवितेत माझ्या शब्द श्वासात गुंफलेले.. ।।१।।

बोल वेड्या मनीचे येतात ओठांवरती
          त्या स्वरात शब्द माझे हृदयात गुंतलेले...।।२।।

प्रेम जीव्हाळा आपुलकी रंग याचेच सारे
       आयुष्य कविता माझी या रंगात रंगलेले...।।३।।

कविता माझी नाळ मनाचे बंध जोडणारी
     शब्द नव्हेत केवळ हे आर्त स्वर काळजातले..।।४।।

भावनांचे नभ जे मनात दाटलेले
        कवितेत माझ्या शब्द श्वासात गुंफलेले..।।५।।

                                          - वेदपाठक शुभम संतोष©
                                           लातूर